कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र धोकादायक

विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात शवविच्छेदन केंद्र तळ अधिक एक मजली १,२०० चौरस मीटर आहे
कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र धोकादायक

विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र धोकादायक झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शवविच्छेदन केंद्राचा वापर करणे रुग्णालयीन स्टाफच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे शवविच्छेदन केंद्राची तातडीने दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या असून पालिका तब्बल २ कोटी ६६ लाख ८९ हजार ५९५ रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढील चार ते पाच महिन्यांत काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे कूपर रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालयात शवविच्छेदन केंद्र तळ अधिक एक मजली १,२०० चौरस मीटर आहे. ही इमारत २० ते २५ वर्षे जुनी झाली असून धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे शवविच्छेदन केंद्राची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. या शवविच्छेदन केंद्राच्या प्रवेशद्वारा जवळील पंप रुम मोडकळीस आले असून त्याची दुरुस्ती, छताची दुरुस्ती अशा विविध दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने निविदा मागवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

स्ट्रक्चरल सल्लागाराची नियुक्ती

शवविच्छेदन केंद्राची दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदारा बरोबर स्ट्रक्चरल सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. दुरुस्तीसाठी सगळा प्रोसिजर सल्लागाराच्या माध्यमातून होणार असून काम पूर्ण झाल्यानंतर सल्लागाराकडून योग्य बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in