
बाजारहाट
बदलत्या काळानुरूप घरातील स्वयंपाकघरामध्ये पुन्हा एकदा तांबे, पितळ, बिडाच्या भांड्यांना लोक पसंती देत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी असो किंवा जेवणाच्या ताटासाठी पुन्हा एकदा लोक तांब्याच्या भांड्यांना पसंती देत आहेत. लग्नात जेवण बनवण्यासाठी लहान, मोठी भांडी खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होते. सध्या ऑनलाइनचा जमाना असला तरी होलसेलमध्ये घरातील भांडी खरेदीसाठी मुंबईसह राज्यभरातून लोक भुलेश्वर, काळबादेवी परिसराला भेट देतात.
दुकानात प्रत्यक्ष जाऊन स्वत:च्या आवडीनुसार भांडी खरेदी करता येत असल्याने ऑनलाइनच्या जमान्यातही दक्षिण मुंबईतील भांड्याच्या बाजारपेठेत नेहमीच गर्दी होत असते, अशी माहिती ‘वंदन स्टील सेंटर’चे मालक राजेश मनतोड यांनी दै. ‘नवशक्ति'शी बोलताना दिली.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जगभरात ओळख आहे. मायानगरी मुंबई आपल्या पोटात सगळ्यांना सामावून घेते. मुंबईत विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ठिकठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे घरगुती सजावटीचे साहित्य, किचनमधील भांडी, लेदर मार्केट, फूल मार्केट आदी वस्तूंची खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ मुंबईत आहे. घरातील स्वयंपाकघरात आवश्यक असणारे साहित्य मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणजे भुलेश्वर, काळबादेवी परिसर. या ठिकाणी स्वयंपाकघरासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून स्वयंपाकघरातील साहित्य खरेदी करण्याबाबतचा लोकांचा ट्रेंड बदलला आहे. मध्यंतरी स्टेनलेस स्टील, काचेची भांडी खरेदी करण्याकडे लोकांचा मोठा कल होता. मात्र, आता पुन्हा एकदा तांबा, पितळेची भांडी खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे राजेश मनतोड यांनी सांगितले.
काळ बदलला, की सगळ्याच गोष्टी बदलतात हे खरे आहे. पण काही ठरावीक काळानंतर जुन्या फॅशन परत येतात आणि जुन्या गोष्टींचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच कळू लागते. सध्या लोखंडाची, पितळेची, तांब्याची आणि अगदी मातीची भांडी वापरण्याचेही फॅड आले आहे. एकीकडे स्टील, अॅल्युमिनियम किंवा निर्लेप कोटिंग असलेल्या भांड्यांचा वापर वाढला असला, तरी आजही अनेक जण पारंपरिक धातूंची भांडी स्वयंपाकासाठी आवर्जून वापरत असल्याचे निदर्शनास आल्याचे मनतोड यांनी सांगितले.
तांबा, पितळ्याच्या भांड्याचा वापर वाढला असून लोक स्टील, काचेची भांडी न घेता आता पुन्हा एकदा तांबा, पितळ्याची भांडी वापरू लागले आहेत. त्यामुळे तांबा, पितळ्यांच्या भांड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु प्रत्येक भांड्यांच्या दरात चढ-उतार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तांब्याच्या भांड्याचा फायदा
तांब्याच्या भांड्यात १५ तासांपेक्षा अधिक काळ पाणी साठवून ठेवले तरी ते पाणी पिण्यासाठी शुद्ध असते. कॅन्सरचे प्रमाण कमी होण्यास तांब्याच्या भांड्याची मदत होते. तांब्यामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया आणि व्हायरस मारतात. तांबा हे मानवी शरीरासाठी आवश्यक सूक्ष्म पोषक तत्त्व आहे.
पितळेच्या भांड्याचे फायदे
पितळेच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. तसेच पितळेच्या भांड्यात अन्न शिजवल्यास ते चविष्ट व चवदार बनते, असा जुन्याजाणत्या लोकांचा अनुभव आहे.