कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण : समीर वानखेडेंना तूर्तास दिलासा कायम

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणात ईडीने ईसीआयआर नोदविल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना...
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण : समीर वानखेडेंना तूर्तास दिलासा कायम

मुंबई : कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणात ईडीने ईसीआयआर नोदविल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा कायम ठेवला. ईडीने नोंदविलेल्या ईसीआयआरलाच आक्षेप घेत वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सॉलीसिटर जनरल बाजू मांडणार असल्याने न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी २५ मार्चपर्यंत तहकूब ठेवली. मुंबई झोनल युनिटमध्ये दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ईडीने कोणतीही कारवाई करू नये. इतकेच नव्हे तर ईडीने नोंदवलेला ईसीआयआर दिल्लीत वर्ग करण्यात येऊ नये अशी मागणी करत समीर वानखेडे यांच्या वतीने ॲड. करण जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. संदेश पाटील यांनी या प्रकरणात सॉलीसिटर जनरल बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी २५ मार्चपर्यंत तहकूब ठेवली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in