पुढील काही आठवडे धोक्याचे; कोरोना मृत्यू संख्येत वाढ होणार

हा धोका पुढील पाच ते सहा आठवडे कायम आहे, राष्ट्रीय कोरोना टास्क फोर्स सदस्यांचा इशारा
पुढील काही आठवडे धोक्याचे; कोरोना मृत्यू संख्येत वाढ होणार

मुंबईसह राज्यात कोरोनाचा उपप्रकार ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असून हा धोका पुढील पाच ते सहा आठवडे कायम आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असून रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत होणारी वाढ पुढील पाच ते सहा आठवडे कायम राहील, असा इशारा राष्ट्रीय कोरोना टास्क फोर्स सदस्य डॉ. सुभाष साळुंके यांनी दिला आहे. दरम्यान, सहव्याधी व ज्या लाभार्थ्यांचे लशीच्या दोन्ही मात्रा घेऊन वर्षभराचा कालावधी उलटला त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने कोरोनाच्या उपप्रकाराचा धोका आहे, असेही डॉ. सुभाष साळुंके यांनी स्पष्ट केले.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. मुंबईत रोज आढळणारी रुग्ण संख्या २१ हजारांच्या घरात पोहोचली होती. तर रोजचा मृत्यूचा आकडा १००च्या पार गेला होता. २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत कोरोनाचे उपप्रकार ओमायक्रॉन एक्सबीबी, बीक्यू, बीए, बीएन, असे नवीन व्हेरिएंटचा शिरकाव झाला. तीन वर्षांत कोरोनाच्या तीन लाटा मुंबईत धडकल्या. लाखो मुंबईकर बाधित झाले तर हजारो मृत्यू झाले. जानेवारी २०२१ मध्ये कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाल्यानंतर टप्याटप्याने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन या लशीच्या मात्रा उपलब्ध झाल्यानंतर मुंबईकरांनी लसीकरण मोहीमेला भरपूर प्रतिसाद दिला आणि कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात राज्य सरकार मुंबई महापालिकेला यश आले.

डिसेंबर २०२२ मध्ये कोरोना संपला अशी चिन्हे दिसू लागली असताना फेब्रुवारी २०२३ च्या मध्यानंतर कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मुंबईत एक अंकी आढळणारी रुग्ण संख्या सध्या तीन अंकावर पोहोचली, तर राज्यात सध्या रोज आढळणारी रुग्ण संख्या हजाराच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असून मे महिन्याच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यापर्यंत कोरोना वाढीचा वेग असाच राहिल, असा स्पष्ट इशारा डॉ. सुभाष साळुंके यांनी दिला आहे.

डायलिसिस, मधुमेह, ब्लड प्रेशर, कॅन्सर, एचआयव्ही, गर्भवती महिला, लहान मुले अशांना कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धोका आहे. तसेच दुसरा डोस व प्रिकॉशन डोस घेऊन वर्षभराचा कालावधी उलटला, अशांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या चाचण्या वाढवणे गरजेचे आहे. परंतु चाचण्या वाढवल्या तर रोज आढळणारी रुग्ण संख्येत वाढ होईल. रोज आढळणारी रुग्ण संख्या एक हजारांच्या घरात पोहोचली तर मृत्यूचे प्रमाण वाढणार, असेही साळुंके यांनी सांगितले.

सरकारची जबाबदारी

कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असून कोरोनाला हरवण्यासाठी लशीच्या मात्रा घ्या असे आवाहन केले जात आहे. मात्र आरोग्य यंत्रणेकडे लशीच्या मात्रांचा ठणठणाट आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लशीच्या अधिकाधिक मात्रा उपलब्ध करुन द्याव्यात, असे डॉ. साळुंके यांनी आवर्जून नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in