दोन वर्षांत भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू

दोन वर्षांत भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू

गेल्या दोन वर्षांत भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीतून समोर आली आहे. तरीही केंद्रातील भाजप सरकार मात्र ४.८ लाख मृत्यू झाल्याचा दावा करते. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी भाजप का लपवते, असा सवाल मुंबई यूथ काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी झिशान यांनी केली आहे. मुंबई युथ प्रदेश कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “कोरोनामुळे उत्तर प्रदेशसारख्या काही राज्यांमध्ये अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. या राज्यांत कोरोनाबळींची संख्या देशामध्ये सर्वात जास्त होती. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी ट्विटरद्वारे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भाजप सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी केली होती. भाजपने केलेली ५० हजार रुपयांची मदत पुरेशी नाही. तसेच केंद्रातील भाजप सरकार कोरोनामध्ये फक्त ४.८ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची आकडेवारी देत आहे. पण डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार देशात ४७ लाख लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.”

“मुंबई यूथ काँग्रेसतर्फे भाजप सरकारकडे मागणी आहे की ४७ लाख लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये सरकारकडून देण्यात यावेत. सरकार चालवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भाजप सरकारने आजपर्यंत अनेक गोष्टी देशातील जनतेपासून लपवल्या आहेत. अनेक गोष्टींचे राजकारण केले. पण कोरोनाबळी ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. यामध्ये मोदी सरकारने राजकारण करू नये, अशी मागणी काँग्रेसची आहे,” असे सिद्दिकी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in