गिरगाव चौपाटीवर शिवराज्याभिषेक, रामायणाचा देखावा: २ प्रोजेक्शन मॅपिंगद्वारे इतिहासाला उजाळा; लाईट आणि साऊंड शो ठरणार पर्यटकांचे आकर्षण

मुंबई महानगरातील नागरिक आणि मुंबईत येणारे पर्यटक स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे आवर्जून येतात
गिरगाव चौपाटीवर शिवराज्याभिषेक, रामायणाचा देखावा: २ प्रोजेक्शन मॅपिंगद्वारे इतिहासाला उजाळा; लाईट आणि साऊंड शो ठरणार पर्यटकांचे आकर्षण

मुंबई : शिवराज्याभिषेक, रामायण, लोकमान्य टिळक जीवनपट, मुंबईची झलक हे सगळ्याचा एकाच ठिकाणी अनुभव मुंबईकरांसह पर्यटकांना मिळणार आहे. स्वराज्य भूमी अर्थात गिरगाव चौपाटीवर प्रोजेक्शन मॅपिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वराज्य भूमीवर असलेल्या टिळक उद्यानातील ‘लाईट ॲण्ड साऊंड शो’चे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मुंबईत स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानात शिवराज्याभिषेक, रामायणातील प्रसंग, लोकमान्य टिळक यांचा जीवनपट आणि मुंबई शहराची झलक हे सर्व काही आता 'लाईट ॲण्ड साऊंड शो'च्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. पालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. याच ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ग्लो पार्कचे लोकार्पण यावेळी झाले.

मुंबई महानगरातील नागरिक आणि मुंबईत येणारे पर्यटक स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे आवर्जून येतात. स्वराज्यभूमीवरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळादेखील आहे. हा परिसर उद्यानाच्या स्वरूपात पूर्वीपासून विकसित आहे. सदर ठिकाणाचे महत्व लक्षात घेता याठिकाणी प्रोजेक्शन मॅपिंगसह लाईट एण्ड साऊंड शो सुरू करण्याचा तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानाचे सुशोभीकरण डी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उद्यानातील पदपथ, हिरवळ, शोभिवंत फुलांची झाडे, विद्युतीकरण, हेरिटेज रेलिंग, आकर्षक आसनव्यवस्था इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उद्यानामध्ये ग्लो पार्कदेखील तयार करण्यात आले आहे. खासकरून लहान मुलांकरिता तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या कामांचे ग्लो पार्कचे लोकार्पणदेखील यानिमित्ताने झाले.

प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी प्रोजेक्शन मॅपिंग

शनिवार आणि रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस तसेच स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे प्रोजेक्शन मॅपिंगचे चलचित्र दाखवण्याचे प्रस्तावित आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० वेळेत या कालावधीत प्रोजेक्शन मॅपिंग दाखवण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in