विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाच्या खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ; एकूण खर्च ४५ कोटींवरून १०४ कोटींवर

विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डापुलाचे काम मुंबई महापालिकेच्यावतीने मे २०१८ मध्ये हाती घेण्यात आले आहे.
विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाच्या खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ; एकूण खर्च ४५ कोटींवरून १०४ कोटींवर
Published on

मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डापुलाचे काम मुंबई महापालिकेच्यावतीने मे २०१८ मध्ये हाती घेण्यात आले आहे. सुरुवातीला या कामासाठी केवळ ४५ कोटींचा खर्च होणार होता. मात्र, मूळ कंत्राट कामाच्या खर्चात वाढ होऊन सद्यस्थितीत एकूण खर्च आता १०४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

विक्रोळीतील रेल्वे उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्यावतीने मे २०१८ मध्ये सुरू झाले. त्यावेळी विविध करांसह ४५ कोटी रुपयांच्या कंत्राट कामाला मंजुरी दिली होती. यासाठी महापालिकेच्यावतीने एच. व्ही. कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुलाच्या बांधकामासाठी अरुंद रस्ता असल्याने व रेल्वे स्टेशनकडे जाणारा-जोडणारा अति रहदारीचा रस्ता असल्याने वाहतुकीकरिता अडथळा टाळण्यासाठी सुपर स्ट्रक्चर डिझाईनमध्ये बदल केले. त्यानुसार बांधकामाचा आराखडा बदलल्यामुळे विविध करांसह मंजूर केलेल्या ४५ कोटींचा खर्च दुपटीने वाढून विविध करांसह ८८.४५ कोटींवर जावून पोहोचला. त्यानुसार तांत्रिक सल्लागार टेक्नोजेम कन्स्ल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या रचनेमध्ये फेरतपासणी सल्लागार आयआयटी मुंबईने मुख्य गर्डरच्या तळाच्या प्लेटची जाडी २५ मी. मी. वरून ३६ मी. मी. व ब्रेसिंग अँगल्सची जाडी १० मी. मी. ने वाढवण्याचे सुचविले. त्यामुळे पुन्हा एकदा याचा खर्च सुमारे ९ कोटी रुपयांनी वाढवून विविध करांसह एकूण ९७ कोटी ३७ लाखांवर जावून पोहोचला.

त्यानंतर आता मुख्य गर्डरच्या वरच्या भागाच्या प्लेटची रुंदी वाढवण्याचे सुचवल्याने तसेच डेक स्लॅबीची जाडी ३०० मी. मी. वरून ३५० मी. मी. झाली. त्यानुसार स्लॅबमधील काँक्रिटचे व सळ्यांचे प्रमाण वाढले असल्याने पुन्हा खर्चात वाढ झाली. त्यामुळे जादा व अतिरिक्त असा ७ कोटी ३९ लाख रुपये यावर खर्च वाढल्याने या पुलाचा आतापर्यंतचा एकूण खर्च विविध करांसह १०४ कोटी ७७ लाख रुपयांवर जावून पोहोचला आहे.

logo
marathi.freepressjournal.in