
कफ परेड, मच्छीमार नगर, गणेशमूर्ती नगर, आंबेडकर नगर आदी परिसर पूरमुक्त होणार आहेत. या भागात नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येणार असून, नवीन गटारे बांधण्यात येणार आहेत. यामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा वेळीच निचरा होणार असून, या कामासाठी मुंबई महापालिका तब्बल सात कोटी ३९ लाख ५१ हजार ४९९ रुपये खर्च करणार आहे.
मुंबईतील फ्लडिंग पॉइंट्स पूरमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत. हिंदमाता गांधी मार्केट परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी भूमिगत टाक्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात येथील रहिवासी व दुकानदारांना दिलासा मिळाला असून, मुंबई महापालिकेच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे. मुंबईतील फ्लडिंग पॉइंट्स पूरमुक्त करण्यासाठी भूमिगत टाक्या बसवणे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे
काम हाती घेण्यात आले आहे.