नगरसेवक निधी आता स्वतंत्र खर्च करणार; ५०० कोटींचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्याने निवडणूक होऊन नवीन लोकप्रतिनिधींची निवड होईल.
नगरसेवक निधी आता स्वतंत्र खर्च करणार; ५०० कोटींचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नगरसेवक निधीतून होणाऱ्या कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे नगरसेवक निधीतून होणारी कामे रखडली असून प्रशासकीय राजवटीत पायवाटा, शौचालयांची कामे, पदपथ, मूलभूत पायाभूत सुविधांची कामे मार्गी लागलेली नाहीत. त्यामुळे तरतूद केलेला निधीचा खर्च होऊ न शकल्याने ६८१ कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपयांच्या निधीचा स्वतंत्र खाते क्रमांक तयार करून आता हा खर्च करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्याने निवडणूक होऊन नवीन लोकप्रतिनिधींची निवड होईल. यासाठी २२७ वॉर्डांकरिता प्रत्येकी ३ कोटी याप्रमाणे ६८१ कोटी रुपयांची तरतूद केली होती. नगरसेवक निधीतून प्रभाग समितीने सुचवलेल्या भांडवली स्वरूपाच्या रस्ते, पदपथ, रस्त्यांच्या बाजूच्या पर्जन्य जलवाहिन्या व सुशोभीकरण आणि इत्यादी विकासकामे केली जातात. परंतु महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार न पडल्यामुळे अद्यापपर्यंत तरतूद केलेला निधी उपलब्ध करून दिलेली नाही. परंतु आता विभागात नगरसेवक नसल्याने विभागीय सहायक आयुक्तांकडे मूलभूत पायाभूत सुविधांच्या कामांची मागणी होत आहे. त्यामुळे या मागणीचा विचार करता विभागांकडून प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने निधीचे पुनर्वाटप करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरसेवक नसल्याने तरतूद रक्कम संबंधित सांकेतांमधून वापरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, पालिकेच्या वतीने आता मुख्यालयाच्या कॉस्ट सेंटरअंतर्गत नवीन लेखा सांकेतांक बनवला आहे. या नवीन सांकेतांकमधून रस्ते, पदपथ, रस्त्याच्या बाजूच्या पर्जन्य जलवाहिनी व सुशोभीकरण तसेच इतर विकासाकामे करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रभागांसाठी तरतूद केलेल्या ६८१ कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी ५०० कोटी रुपयांचा निधी नवीन लेखा सांकेतांकमध्ये वळता करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in