देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत; स्वीडनच्या कंपनीसह पायलट प्रोजेक्ट राबवणार
मुंबई : मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीची उत्सुकता संपणार असून लवकरच देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार असून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकी दरम्यान केल्या.
मंत्रालयात शुक्रवारी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री राणे यांच्याशी महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत वाहतूक यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूककोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. स्वीडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल, असेही ते म्हणाले.
स्वीडनची कँडेला कंपनी सर्व माहितीचे सादरीकरण करेल. त्यानंतर वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करू, असे ओस्टबर्ग म्हणाले.
पोर्टच्या ससून डॉकला मॉडेल पोर्ट करा - मंत्री राणे
ओस्टबर्ग यांनी पोर्टच्या विकासात स्वीडन कंपनी योगदान देऊ इच्छित असल्याचे सांगितल्याने मंत्री राणे यांनी ससून डॉकची पाहणी करण्याची सूचना केली. स्वीडन कंपनीने पोर्टच्या विकासाबाबत प्रस्ताव सादर करावा. वाहतुकीसाठी सुलभ ठिकाणांची पाहणी करून मॉडेल पोर्ट विकसित करावे. यासाठी मेरीटाइम बोर्डाशी चर्चा करून एप्रिलमध्ये पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. ओस्टबर्ग यांनी पोर्टचा विकास, स्वच्छता, सोयीसुविधा, गुंतवणुकीबाबतची माहिती दिली.