
लुटमारीसाठी घातक शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. आदम शेरमोहम्मद खान आणि श्वेता सूर्यकांत लाड अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मौजमजा आणि नशा करण्यासाठी श्वेता ही आदमला मदत करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
कांदिवली परिसरात काहीजण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी एपीआय सूर्यकांत पवार व त्यांच्या पथकाने साध्या वेशात पाळत ठेवून आदम आणि श्वेता या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. हे दोघेही प्रियकर-प्रेयसी असून रात्रीच्या वेळेस घातक शस्त्रांचा धाक दाखवून पादचाऱ्यांना लुटण्याचे काम करत होते. त्यासाठी आदमने उत्तर प्रदेशातून देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणले होते. लुटमारीच्या पैशातून ते दोघेही मौजमजा तसेच नशा करत होते. आदम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.