
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून उत्तरप्रदेशातून अपहरण करून आणलेल्या एका १८ वर्षांच्या तरुणीचे टिळकनगर पोलिसांनी सुटका करुन तिची कुंटनखान्यात विक्री करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी एका पती-पत्नीला पोलिसांनी अटक करुन त्यांच्या तावडीतून या तरुणीची सुखरुप सुटका केली.
अमन शर्मा आणि आंचल शर्मा अशी या पती-पत्नीची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेशच्या आझमगढचे रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. १८ वर्षांची बळीत तरुणी ही उत्तरप्रदेशची रहिवाशी असून ती तिच्या आई-वडिल आणि तीन बहिण-भावासोबत राहते. तिचे तिच्या कुटुंबियांशी पटत नव्हते. फेब्रुवारी महिन्यांत तिची अमनसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. तिनेही त्याच्यासोबत पळून जाऊन लग्नासाठी होकार दिला होता. त्यामुळे गुरुवारी १८ मे रोजी तो तिला घेण्यासाठी तिच्या घराजवळ आला हेता. तेथून ते दोघेही बनारस आणि पवन एक्सप्रेसने मुंबईत आले होते. यावेळी अमनसोबत आंचल ही तिच्या आठ महिन्यांच्या मुलासोबत होती. त्याने तिला आंचल ही तिच्या भावाची पत्नी असल्याचे सांगितले होते.