२० रुपयांसाठी तब्बल २२ वर्षे दिला न्यायालयीन लढा,रेल्वेला द्यावी लागणार भरपाई

२५ डिसेंबर १९९९ रोजी तुंगनाथ चतुर्वेदी हे मथुरा केंट स्टेशनला पोहोचले. त्यांना मुरादाबादला जायचे होते
२० रुपयांसाठी तब्बल २२ वर्षे दिला न्यायालयीन  लढा,रेल्वेला द्यावी लागणार भरपाई

रेल्वे प्रवास करताना अनेक विविध प्रसंग आपण अनुभवले आहेत; मात्र उत्तर प्रदेशच्या मथुरातील वकील तुंगनाथ चतुर्वेदी यांनी चक्क बुकिंग क्लार्कने घेतलेल्या अधिकच्या २० रुपयांसाठी तब्बल २२ वर्षे न्यायालयीन लढा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा हा लढा यशस्वी ठरला असून २२ वर्षांनी त्यांचा विजय झाला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला तुंगनाथ यांना तब्बल २० हजार रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे.

२५ डिसेंबर १९९९ रोजी तुंगनाथ चतुर्वेदी हे मथुरा केंट स्टेशनला पोहोचले. त्यांना मुरादाबादला जायचे होते. त्यांनी बुकिंग क्लार्कला दोन तिकिटे देण्यास सांगितली. त्यावेळी एका तिकिटाचा दर ३५ रुपये होता; मात्र बुकिंग क्लार्कने तुंगनाथ यांच्याकडून ७० रुपयांऐवजी ९० रुपये घेतले. एका तिकिटाची किंमत ३५ रुपये असल्याने तुंगनाथ यांनी बुकिंग क्लार्कला २० रुपये परत देण्यास सांगितले; मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. दोघांमध्ये बराच वाद झाला. त्याचवेळी पॅसेंजर ट्रेन आली आणि तुंगनाथ ट्रेन पकडायला गेले; मात्र हा प्रकार त्यांच्या लक्षात राहिला. प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी मथुऱ्यातील जिल्हा ग्राहक पंचायतीत खटला दाखल केला. ईशान्य रेल्वे गोरखपूर आणि मथुरा केंट रेल्वे स्थानकाचे विंडो बुकिंग क्लार्क यांच्याविरोधात तुंगनाथ यांनी खटला दाखल केला. भारतीय रेल्वेविरोधात तब्बल २२ वर्षे तुंगनाथ २० रुपयांसाठी लढले. अखेर २२ वर्षांनी तुंगनाथ यांना विजय मिळाला आहे. आता रेल्वेला तुंगनाथ यांना तब्बल २० हजार रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. २० रुपयांवर दरवर्षी १२ टक्के व्याज, मानसिक, आर्थिक आणि खटल्यावर खर्च झालेले १५ हजार रुपये इतकी रक्कम तुंगनाथ यांना मिळणार आहे. ३० दिवसांत ही रक्कम रेल्वेला द्यावी लागेल. रेल्वेने ही रक्कम न दिल्यास त्यांना २० हजार रुपयांवर १५ टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in