उद्धव ठाकरे, संजय राऊतांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ;राहुल शेवाळे यांचा १०० कोटीचा मानहानीचा दावा

न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठाकरे आणि राऊत यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
उद्धव ठाकरे, संजय राऊतांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ;राहुल शेवाळे यांचा १०० कोटीचा मानहानीचा दावा

मुंबई : शिंदे शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत ‘सामना’ वृत्तपत्रातून बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने अडचणीत आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने झटका दिला. शेवाळे यांनी दाखल केलेल्या १०० कोटी रुपयांच्या मानहानी दाव्यातून दोषमुक्त करण्याची विनंती करणारा ठाकरे आणि राऊत यांचा अर्ज दंडांधिकारी एस. बी. काळे यांनी फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठाकरे आणि राऊत यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी सांगितले की, “माझ्या आशिलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांच्या याचिकेतून मान्य करण्यात आले आहे. पण ते कृत्य आम्ही केलेले नाही तर आमच्या वृत्तपत्राचे जे सहसंपादक अतुल जोशी आहेत, ते या बातमीसाठी जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रकरणावरील निकालानुसार, कोणत्याही वृत्तपत्राचे मालक-संपादक हे प्रत्येक छापून येणाऱ्या गोष्टीसाठी जबाबदार असतील. त्यानुसार, उद्धव ठाकरे मालक आणि मुख्य संपादकही आहेत.”

२९ डिसेंबर २०२२ रोजी ‘सामना’मध्ये छापलेल्या वृत्तानुसार, शेवाळे यांचा पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये राहुल शेवाळे यांचा सहभाग असल्याचे आहे. याप्रकरणी शेवाळे यांनी माझगांव न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा काही संबंध नाही. पीआरबी कायद्यानुसार वृत्तांची निवड करणे आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जबाबदारी ही सहसंपादक अतुल जोशी यांची असल्याने या खटल्यातून दोषमुक्त करावे, अशी विनंती करणारा अर्ज अ‍ॅड. मनोज पिंगळे यांनी केला होता. त्या अर्जावर दंडाधिकारी एस. बी. काळे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांचा दावा अमान्य करत दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून लावला .

logo
marathi.freepressjournal.in