
मुंबई : प्रेमसंबंधात लग्न करण्याचे दिलेले वचन कालांतराने मोडणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. अनेकदा प्रेमसंबंध असलेल्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणात लग्नाचे वचन मोडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला जातो. मात्र हा आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक हेतूच नसतो, असे सत्र न्यायालयाचे न्या. सत्यनारायण आर. नवंदर यांनी जामीन देताना स्पष्ट केले.
आत्महत्या केलेल्या महिलेची आरोपी तरुणाशी ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमभावना निर्माण झाली. त्यांनी शारीरिक संबंध ठेवले होते. तरुणाने महिलेला तिच्याशी लग्न करण्याचे वचनही दिले होते. तरुणाचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे आत्महत्या केलेल्या महिलेला कळले. यातून वादावादी झाल्यानंतर तरुण हा महिलेशी बोलणे टाळू लागला.