
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात एका 'कन्सल्टन्सी फर्म'ला दोषमुक्त करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला. जरी एखाद्या व्यक्तीला काहीही माहिती नसली तरी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुन्ह्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाशी संबंधित कोणत्याही कृतीत सहभागी असेल तर त्या व्यक्तीवर मनी लाँड्रिंगचा खटला चालवता येतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मेसर्स पॉझिटिव्ह ग्लोबल सर्व्हिस अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ट्रेड कनेक्टचे संचालक आदित्य विजय कश्यप यांनी दोषमुक्ततेसाठी विनंती केली होती. त्यांच्या अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावणी घेतली. कश्यप यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला चालवला जात आहे. फोर्टिस इंटरनॅशनल कंपनी सुरू करणाऱ्या आरोपींच्या टोळीविरुद्ध संबंधित गुन्ह्यात हा खटला दाखल केलेला आहे.