दहिसर-भाईंदर अंतर पार करा १० मिनिटांत आठ लेनचा उन्नत रस्ता ; दोन हजार कोटींचा खर्च

दहिसर खाडी भागात या प्रकल्पाच्या निमित्ताने स्टीलचा सुमारे १०० मीटर अंतराचा पूल तयार करण्यात येईल
दहिसर-भाईंदर अंतर पार करा १० मिनिटांत 
आठ लेनचा उन्नत रस्ता ; दोन हजार कोटींचा खर्च

मुंबई : मुंबईसह परिसरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी दहिसर-भाईंदर उत्तन रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणाऱ्या या प्रकल्पात एक पूल आणि दोन आंतरबदल मार्गिकांचा समावेश असून, ८ लेनचा उन्नत रस्ता असणार आहे. मुंबई किनारी रस्त्याचा अंतिम टप्पा असलेला हा उन्नत मार्ग ४ वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष असून, विनाअडथळा व विनासिग्नल असा १० मिनिटांत प्रवास करता येणार आहे. दहिसर (पश्चिम) ते भाईंदरदरम्यान (पश्चिम) होणाऱ्या उन्नत रस्त्यांसाठी एलअँडटी कंपनीची निवड करण्यात आली आहे. या उन्नत रस्त्यांसाठी १ हजार ९८१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान व्हावा तसेच मुंबई आणि भाईंदर ही दोन शहरे जोडण्यासाठी उन्नत मार्गाची आखणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार आराखडा तयार करून दहिसर-भाईंदर उन्नत मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रकल्पाच्या निमित्ताने जलद वाहतुकीचा पर्याय दोन्ही शहरांतील नागरिकांना मिळणार असून, सिग्नलचा अडथळा नसलेला मार्ग तसेच वाहतूककोंडीला पर्याय म्हणून या नवीन मार्गाचा वापर नागरिकांना करता येईल, अशी माहिती वेलरासू यांनी दिली. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर पुढील तीन वर्षांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही कंपनीची असणार आहे.

रोज ७५ हजार वाहनांची ये-जा!

दहिसर खाडी भागात या प्रकल्पाच्या निमित्ताने स्टीलचा सुमारे १०० मीटर अंतराचा पूल तयार करण्यात येईल. एकूण ५ किमी उन्नत मार्गांसाठी एकूण ३३० खाबांचा आधार असणार आहे. प्रत्येक ३० मीटर अंतरावर हे खांब असतील. संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करण्यात येणार आहे. दहिसर-भाईंदर जोड रस्त्यावर प्रतिदिनी एकूण ७५ हजार वाहनांची ये-जा असेल. या प्रकल्पाअंतर्गत २ आंतरबदल मार्गिका असतील. त्यामध्ये दहिसर आणि भाईंदर अशा दोन्ही बाजूसाठी आंतरबदल मार्गिका असेल, तर पाच किलोमीटरच्या अंतरासाठी आठ मार्गिकांचा समावेश असणार आहे, अशी माहिती उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली.

असा असेल पूल

दहिसर पश्चिम आणि भाईंदर पश्चिमेला कनेक्टिव्हिटी

उन्नत मार्गाची एकूण लांबी- ५ किमी

उन्नत मार्गाची रूंदी- ४५ मीटर

एकूण मार्गिका- ८ (आठ)

वाहनांचा अंदाजित वापर- ७५ हजार प्रति दिन

प्रकल्पासाठी अंदाजित कालावधी- ४८ महिने

प्रकल्पासाठी अंदाजित खर्च- १ हजार ९५९ कोटी रुपये

देखभाल आणि दुरुस्ती खर्च- (३ वर्षे) २३ कोटी रुपये

आंतरबदल मार्गिकांची संख्या- २

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in