मुंबईकरांनो, आता तरी घाबरा! मे महिन्यात रुग्ण संख्या १० पटीने वाढणार; पालिकेचा इशारा

वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता एकट्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १,८५० बेड्स तैनात करण्यात आले आहेत
मुंबईकरांनो, आता तरी घाबरा! मे महिन्यात रुग्ण संख्या १० पटीने वाढणार; पालिकेचा इशारा

फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असून मार्च महिन्यात रुग्ण संख्येत तेरा पट वाढ होत तब्बल १,७१९ रुग्णांची नोंद झाली होती. तर धक्कादायक म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत तब्बल १,९४१ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण संख्येत होणारी वाढ कायम राहणार असून मे महिन्यात रोज आढळणाऱ्या बाधित रुग्ण संख्येत १० पटीने वाढ होईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता एकट्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १,८५० बेड्स तैनात करण्यात आले आहेत.

मार्च २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत कोरोनाच्या तीन लाटा मुंबईत धडकल्या. मात्र, आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजना व मुंबईकरांची साथ यामुळे कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात पालिकेला यश आले. मात्र, फेब्रुवारी २०२३ पासून रुग्ण संख्येत वाढ होत असून एका दिवसात तिप्पट वाढ झाल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत दोन हजार रुग्णांची नोंद झाली असून ही रुग्ण वाढ कायम राहणार आहे. त्यामुळे मे महिन्यात रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत १० पटीने वाढ होईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्ण संख्येचा धोका लक्षात घेत मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण १६ रुग्णालये, दवाखाने, राज्य सरकारची जे. जे., सेंट जॉर्ज, कामा व जीटी रुग्णालये व ३४ खासगी रुग्णालयांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी १० व ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील घेण्यात आले. मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयातील ४ हजारांहून अधिक बेड्स तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

चाचण्या वाढल्या, तर रुग्ण संख्येत वाढ निश्चित

मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच रुग्णवाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी निर्णायक बैठक घेऊन चाचण्या वाढवण्याचे निर्देश राज्यांसह स्थानिक प्रशासनांना मागील आठवड्यात दिल्या. पालिकेने यानंतर दररोज दहा हजार चाचण्या करण्याची आपली क्षमता असल्याचेही सांगितले. मात्र अद्याप दोन हजारांहून कमी चाचण्या होत आहेत. मुंबईत चाचण्या वाढवल्यास खरा प्रकोप समोर येईल, असे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

अशी आहे तयारी

- मुंबईत पालिका, सरकारी आणि ३६ खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या मॉकड्रिलनुसार २१२४ आयसोलेशन बेड, १३८१ ऑक्सिजन बेड, ७४७ आयसीयू, ६९७ व्हेंटिलेटर असे एकूण ४७०९ बेड तैनात ठेवण्यात आले आहेत.

- ३३१५ डॉक्टर्स, ५८३१ नर्स, २२८४ आरोग्य कर्मचारी असा एकूण ११४३० आरोग्य कर्मचार्‍यांची टीम तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच १९६ एम्ब्युलन्स तैनात आहेत. ३४ हॉस्पिटल आणि ४९ लॅबमध्ये कोरोना चाचण्यांची व्यवस्था आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in