आता नाकावाटे ऑन द स्पॉट लसीकरण...

दोन्ही मात्रा घेतलेल्या ज्येष्ठांना इन्‍कोव्‍हॅक लस उपलब्ध
आता नाकावाटे ऑन द स्पॉट लसीकरण...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जेष्ठ नागरिकांसाठी इन्‍कोव्‍हॅक लस उपलब्ध झाली आहे. ही लस नाकावाटे देण्यात येणार असून, ६० वर्षांवरील लाभार्थ्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीच्या दोन्ही मात्रा घेऊन सहा महिने झाले असतील, त्यांना इन्‍कोव्‍हॅक लस शुक्रवारपासून पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर मिळणार आहे. ही लस ऑन द स्पॉट नोंदणी करताच मिळणार, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, अन्य कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्‍कोव्‍हॅक लस देता येणार नाही, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असताना पुण्याच्या सिरम इस्ट्टुट व हैद्राबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या लस उपलब्ध झाल्यानंतर मुंबईत १६ जानेवारी २०२१पासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर, अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली, तर १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) १० जानेवारी २०२२पासून देण्यात येत आहेत.

मुंबईत २४ ठिकाणी करता येणार नोंदणी

मुंबईत २४ ठिकाणी इन्‍कोव्‍हॅक लस स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पाट नोंदणीद्वारे देण्यात येईल. २४ विभागातील सर्व लसीकरण केंद्रांची नावे व पत्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्वीटर खात्यावर दररोज प्रकाशित करण्यात येतील. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

सव्वा दोन कोटी लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण!

२६ एप्रिल २०२३ रोजी मुंबईत कार्यक्षेत्रात कोविड प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची एकूण संख्‍या २ कोटी २१ लाख ९६ हजार ९९५ इतकी आहे. यात पहिली मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या १ कोटी ८ लाख ९३ हजार ६७९ आहे. तर, दुसरी मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या ९८ लाख १५ हजार ०२० इतकी आहे. प्रतिबंधात्मक डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या १४ लाख ८८ हजार २९६ आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in