मुंबई : मुंबईत झालेल्या कोविड घोटाळाप्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयात ‘ईडी’ने ७५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात लाइफलाईन हॉस्पिटल, त्याच्या व्यवस्थापनातील सुजीत पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शहा, राजीव साळुंखे, डॉ. किशोर बिशोरे व अरविंद सिंग यांच्यावर ठपका ठेवला आहे. बनावट कागदपत्रे बनवून ३२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी ‘ईडी’ने ४० साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. हे आरोपपत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे नोंदवले आहे. पाटकर यांच्या संस्थेला कंत्राटानुसार मुंबई मनपाकडून ३२ कोटी रुपये मिळाल्याचे तपासात आढळले आहे. त्यातील २२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम बनावट कंपन्यांमार्फत वळवण्यात आली. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढण्यात आली. या पैशाचा माग काढण्यात आला आहे. या प्रकरणात काही व्यक्तींना पैसे देण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे पैसे रोख स्वरूपात परत दिले.
एनएससीआय वरळी, दहिसर येथे हॉस्पिटल उभारणीचे कंत्राट लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीला देण्यात आले. तसेच त्यांना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कामही दिले होते, असे ‘ईडी’च्या तपासात आढळले.
कंपनीने मुंबई मनपाला कर्मचाऱ्यांच्या हजेरीचे दिलेले रेकॉर्ड्स व कामाची कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात आढळले. कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे बनावट कागदपत्रे सादर करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जास्त पैसे दिल्याचे भासवले गेले. ही सर्व बाब ‘ईडी’च्या तपासात आढळली.
कोविड काळात कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली. पाटणकर यांनी मुंबई मनपाच्या अधिकाऱ्यांचा विश्वास जिंकला. डॉ. बिसुरे व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा जेवणाचा खर्च हा पाटकर करत होता, असे ‘ईडी’च्या तपासात आढळले.