प्लास्टिक पिशव्यांवरील धडक कारवाई सुरुच; ६७० किलो प्लास्टिक जप्त

अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे
प्लास्टिक पिशव्यांवरील धडक कारवाई सुरुच; ६७० किलो प्लास्टिक जप्त

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री व उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकाही प्रशासनाने दिला आहे. १५ ऑगस्टनंतर कठोर अंमलबजावणी सुरुवात होणार असून, आतापर्यंत महिनाभरात ६७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे, तर १७७ जणांवर कारवाई करत तब्बल आठ लाख ८० हजारांचा दंड वसूल केल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई धडाक्याने सुरू झाली होती; मात्र कोरोना संकटामुळे दोन वर्षे प्लास्टिक कारवाई थांबली होती. आता ही कारवाई पालिकेने पुन्हा सुरू केली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्याला घातक आणि पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुराला याच पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. पालिकेने आतापर्यंत महिनाभरात केलेल्या कारवाईत ६७० किलोवर प्लास्टिक जप्त केले आहे, तर आठ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in