खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांची हाडे खिळखिळी; दररोज सरासरी २५ तरुण रुग्ण तपासणीला

गेल्या महिन्यात खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. त्यात काही जणांचे बळीही गेले आहेत.
खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांची हाडे खिळखिळी; दररोज सरासरी २५ तरुण रुग्ण तपासणीला

रस्त्यातील खड्ड्यांनी मुंबईकरांना हैराण केले आहे. खड्ड्यांमुळे गाड्यांची वाट लागत असतानाच तरुणांची हाडे खिळखिळी होत असल्याचा अनुभव आता मुंबईकरांना येत आहे. विशेष म्हणजे, दुचाकी चालवणाऱ्या २५ ते ४० वयोगटातील सरासरी २५ रुग्ण रोज पाठदुखी, मानदुखीचा त्रास घेऊन डॉक्टरकडे जात आहेत. खड्ड्यांचा सर्वात मोठा त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. गेल्या महिन्यात खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. त्यात काही जणांचे बळीही गेले आहेत.

पाठदुखी व मानदुखीने त्रस्त असलेले दररोज सरासरी २० ते २५ रुग्ण तपासणीसाठी विविध रुग्णालयात येत आहेत. खड्ड्यांतून प्रवास केल्यामुळे त्यांना या नव्या समस्याने ग्रासले आहे. या रुग्णांना औषधांबरोबरच नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जात आहे. मुंबई मनपाच्या माहितीनुसार, २१ जुलैपर्यंत मुंबईत १६ हजार खड्डे होते. मालाड, जोगेश्वरी, अंधेरी भागात सर्वात जास्त खड्डे आढळले. गेल्या महिन्यात १५ हजार खड्डे बुजवले.

सरकारी रुग्णालयातील मणक्याचे सल्लागार सर्जन यांनी सांगितले की, दुचाकी खड्ड्यांतून गेल्यानंतर मान व पाठदुखी होणे स्वाभाविक आहे. यामुळे गंभीर दुखापती होऊ शकतात. खड्ड्यांमुळे अचानक वाहन थांबवल्याने मणक्याला मोठा धक्का बसतो. त्यातून दुखापत होऊ शकते. जेव्हा मणक्याला दुखापत होते, तेव्हा हात व पायाच्या अवयवांच्या संवेदनांच्या समस्या सुरू होतात. यातून बाहेर पडायचे असल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. यातूनही रुग्ण न बरा झाल्यास त्याला झोपून राहावे लागते, असे ते म्हणाले. खड्ड्यांमुळे २० ते ४० वयोगटातील तरुणांना स्लीप डिस्कचा त्रास निर्माण होऊ शकतो. शिवाय मणक्याला फ्रॅक्चर होऊ शकते.

खड्ड्यांमधून प्रवास केल्यास मणक्याला इजा होते. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून कधी-कधी त्याच्यावर कोणतेही उपचार करता येत नाहीत. अनेक तरुण आपल्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करतात. अतित्रास झाल्यानंतर ते उपचारासाठी येतात. तसेच बहुतांशी रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतात. ते चुकीचे आहे. खड्डे व खराब रस्त्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

- डॉ. ओंकार सदिगले, अस्थिरोग सर्जन

दुचाकीस्वारांमध्ये मानेचा त्रास हा तीन ते चारपट आढळत आहे. बहुतांश रुग्ण हे २५ ते ४० वयोगटातील असून त्यांना पाठदुखीने हैराण केले आहे. मी स्वत: रोज सरासरी २५ रुग्णांवर उपचार करत आहे. त्यातील १० ते १२ जणांना गंभीर दुखापत झाल्याचे आढळून येत आहे.

- डॉ. ओम पाटील, अस्थिरोग व मणका रोगतज्ज्ञ,

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in