गिरीश चित्रे/मुंबई
सीएसएमटी स्थानकाजवळील १५० वर्षें जुने महात्मा जोतिबा फुले अर्थात क्रॉफर्ड मार्केट आता नवीन रूपात साकारण्यात येत आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक एकर क्षेत्रफळावर लॅण्डस्केपिंग, वाहन पार्किंग, मासळी विक्रेत्यांसाठी शीतगृह सुसज्ज आकर्षक मार्केट लवकरच लोकांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या मार्केटचे काम चार टप्प्यात होत आहे. त्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, तर तिसऱ्या टप्प्यातील ९० टक्के तर चौथ्या टप्प्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. क्रॉफर्ड मार्केटची इमारत हेरिटेज दर्जा प्राप्त असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत काम टप्याटप्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
क्रॉफर्ड मार्केट इमारतीचे बांधकाम ऐतिहासिक असल्याने ऐतिहासिक बांधकाम वगळता मागील बाजुकडील भाग जमीनदोस्त करण्यात आला आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारली जात आहे. मासळी, फळ, भाजीपाला, चीनी मातीच्या भांडयासाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये एकूण २५३ गाळे असून या इमारतीच्या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण, पार्किंगची समस्या अशा विविध गोष्टींमुळे या मार्केटची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
१८६६ मध्ये हे मार्केट बांधण्यात आले आहे. १९६५ मध्ये मुंबई महापालिकेचे पहिले आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आर्थर ट्रॅवर्स क्रॉफर्ड यांनी मार्केट बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मार्केटच्या कामाला सुरुवात झाली. आज या मार्केटला १५० वर्षे पूर्ण झाली असून २०१६ मध्ये या मार्केटची पुनर्बांधणी करण्याचा पालिका प्रशासनाने घेतला. त्यानंतर आता कामाला वेग दिला आहे.
बाबू गेनू मार्केटही लवकरच सेवेत
माझगाव येथील बाबू गेनू मार्केटचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत नवीन वेंडर्सना स्थलांतरित करण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर २०१३ मध्ये मंडई बाबू गेनू मार्केटची इमारत कोसळली होती. त्या दुर्घटनेत ६१ लोकांचा जीव गेला. २०१६ मध्ये मार्केटच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच मुंबईकरांच्या सेवेत मार्केट उपलब्ध होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.