मुंबई : दक्षिण मुंबईतील महात्मा फुले मार्केट (क्रॉफर्ड मार्केट) ते जे. जे. रुग्णालय दरम्यान केवळ एक किमी अंतर आहे. हे अंतर कापायला केवळ १० मिनीटे पुरेशी आहेत. मात्र, रोज हे अंतर कापायला अर्धा तास तर सणाच्या काळात हेच अंतर कापायला पाऊण तास ते एक तास लागतो. कारण या रस्त्यावर कायद्याचे राज्य आहे की नाही, असा भास कायम होत राहतो. या रस्त्यावर प्रत्येक कायदा मोडला जातो.
या रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारचालकांच्या व्यथा त्यांनाच ठावूक. या मार्गावर बेकायदा पार्किंग आहे. तसेच मोहम्मद अली रोडवर अतिक्रमणे झाली आहेत. फुटपाथवर फेरीवाले व दुकानदारांनी ठाण मांडले आहे. या छोटया रस्त्यावर पार्किंगला परवानगी नाही. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा चार चाकी व दुचाकी गाड्या लावलेल्या असतात. रस्त्यावर फेरीवाले कापडे व अन्य वस्तू विकत असतात. सिग्नल तोडणे ही तर या रस्त्याची खासीयत. तरीही वाहतूक पोलीस याबाबत नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. अनेक दुकानदार त्यांच्या वस्तू विक्रीसाठी रस्त्यावर आणून ठेवतात. तर इलेक्ट्रीक मोटरची दुरुस्तीही रस्त्यावरच होत असते. याबाबत मुंबई मनपाच्या स्थानिक कार्यालयात तक्रार दाखल केली तरीही कारवाई केली जात नाही, असे स्थानिक नागरिक उस्मान पीरमोहम्मद यांनी सांगितले.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. हा एक असा रस्ता आहे जिथे मुंबई मनपा किंवा वाहतूक पोलिसांचे आदेश चालत नाहीत. या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याचे कर्तव्यच जणू अधिकाऱ्यांनी विसरले असावे, असे दिसून येते.