
मुंबई : गृहकर्जासह क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन महिलांसह सातजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. प्रदीप रामशिरोमणी मौर्या, अब्दुल आहात इमारुल हक्क शेख, कादर अहमद परमार, जगदीश रामभाऊ जामखंडेकर, मिनाक्षी सतीश शिरधनकर, सुषमा ऊर्फ शिल्पा हेमंत मोहिते आणि मंजू जितेश गायकवाड अशी या सातजणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ६० हजाराची कॅश, विविध ग्राहकांचे आधारकार्ड, डेबीट काड्र, कंपन्यांचे रबरी शिक्के, ग्राहकांच्या नावे असलेले सिमकार्ड, नऊ मोबाईल फोन आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या सातजणांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदारांना त्यांच्या मुलीच्या आजारासाठी पैशांची गरज होती. गेल्या वर्षी जून महिन्यांत त्यांची प्रदीप मौर्याशी ओळख झाली होती. त्याने त्यांना कर्जासह क्रेडिट कार्ड तसेच या कार्डवर जास्त लिमिट मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये घेतले होते. त्यांच्याकडून घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन त्याने त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरू असताना भांडुप, मुलुंड, कुर्ला, वडाळा परिसरातून या कटातील मुख्य आरोपी प्रदीप मौर्यासह इतर सहाजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर शुक्रवारी अटकेची कारवाई करण्यात आली होती.
इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
चौकशीत या टोळीने फसवणुकीसाठी एका व्यावसायिक गाळा भाड्याने घेतला होता. अनेकांना गृहकर्जासह क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखवून ते त्यांच्याकडून त्यांचे कागदपत्रांसह कमिशन म्हणून काही रक्कम घेत होते. क्रेडिट कार्ड प्राप्त झाल्यानंतर ते त्याचा वापर स्वतसाठी करत होते. त्यासाठी त्यांनी स्वाईप मशिन घेतली होती. त्यांच्या अटकेने फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या गुन्ह्यांत भावना उत्तेकर या महिलेसह इतरांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.