कोस्टल रोड प्रकल्पात श्रेयाचे वाटेकरी कोण? २०११ च्या स्थायी समितीने स्वतःचीच पाठ थोपटली

कोस्टल रोड प्रकल्पात श्रेयाचे वाटेकरी कोण? २०११ च्या स्थायी समितीने स्वतःचीच पाठ थोपटली

कोस्टल रोड प्रकल्प आमच्यामुळे मार्गी लागला अशी श्रेयाची लढाई शुक्रवारी पालिका सभागृहात पहावयास मिळाली.

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्प आमच्यामुळे मार्गी लागला अशी श्रेयाची लढाई शुक्रवारी पालिका सभागृहात पहावयास मिळाली. कोस्टल रोड प्रकल्पास २०११ च्या स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्यावेळच्या स्थायी समितीचे माजी नगरसेवक, तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार, आजी माजी अभियंता यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेवकांनी आपल्या पक्षामुळे कोस्टल रोड मार्गी लागला, असे सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली.

मुंबई महानगरपालिकेने मध्य वैतरणासह मुंबईकरांच्या हिताचे अनेक मोठे प्रकल्प साकारले. पण याचे श्रेय आतापर्यंत स्थायी समितीने घेतले नाही. कोस्टल रोड प्रकल्प साकारावा यासाठी स्वतः काही केलेले नसतानाही २०११ च्या स्थायी समितीने मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात शुक्रवारी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. एवढेच नाही, तर पालिका प्रशासनाकडून सत्कारही करून घेतला.

मुंबई शहरात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेऊन, १९६२ मध्ये मुंबईतील वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी विल्बर स्मिथ आणि असोसिएट्स या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने त्यावेळी हाजी अली आणि नरिमन पॉइंट दरम्यान ३.६ किमी लांबीचा रस्ता आणि गिरगाव चौपाटीपर्यंत मलबार हिलच्या खाली १.०४ किमीचा बोगदा बांधण्याची शिफारस केली होती; मात्र त्यानंतर तब्बल ५० वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम मुक्त मार्गाच्या योजनेला पर्याय म्हणून कोस्टल रोडचा प्रस्ताव दिला. चव्हाण यांनी एमएसआरडीसीला कॅपिटल इंटेन्सिव्ह सी लिंकऐवजी कोस्टल रस्ते बांधण्याचा विचार करण्यास सांगितले. २०११ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्या नेतृत्वाखाली कोस्टल रोड तयार करण्याच्या योजनेचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नेमली.

कोस्टल रोड प्रकल्पासाठी पहिल्यांदा पालिकेच्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूदही करण्यात आली तर दुसरीकडे तांत्रिक समिती नेमण्यासंदर्भातचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठीही सादर करण्यात आला होता. याचाच आधार घेत, कोस्टल रोडचे संपूर्ण श्रेय २०११ मधील तत्कालीन समिती अध्यक्ष विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या स्थायी समितीने घेण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पालिका प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या हस्ते शेवाळे यांच्यासह समिती सदस्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. पालिकेच्या इतिहासात अशाप्रकारे एखाद्या प्रकलपाचे श्रेय स्थायी समितीने घ्यावे, ही पहिलीच घटना आहे.

logo
marathi.freepressjournal.in