मध्य रेल्वेचे रडगाणे सुरूच, सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांचे हाल

दोन आठवड्यांपासून मध्य रेल्वेच्या लोकल, एक्स्प्रेस सेवेचा बोजवारा उडाला असतानाच गुरुवारी सकाळी विक्रोळी येथे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवेचे बारा वाजले.
मध्य रेल्वेचे रडगाणे सुरूच, सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई : दोन आठवड्यांपासून मध्य रेल्वेच्या लोकल, एक्स्प्रेस सेवेचा बोजवारा उडाला असतानाच गुरुवारी सकाळी विक्रोळी येथे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवेचे बारा वाजले. लोकल जागीच थांबल्याने अखेर प्रवाशांनी लोकलमधून उड्या टाकून रेल्वे मार्गातून चालत इच्छित स्थळ गाठले. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील त्रुटीमुळे गेल्या दोन आठवड्यापासून मध्य रेल्वेवरील लोकल उशिराने धावत आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशी त्रस्त झाले आहेत. यातच गुरुवारी सकाळी ७ वाजता विक्रोळी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. सकाळी गर्दीच्या वेळी सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर बिघाड झाल्याने लोकल एकामागे एक थांबल्या. यामुळे प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली.

लोकल जागीच थांबल्या तरी याबाबतचे कारण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी लोकलमधून उतरून चालत इच्छित ठिकाण गाठले.मात्र, लोकलमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला वर्ग लोकलमध्ये अडकले. यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लेटमार्क लागला. गेल्या दोन आठवड्यांपासून लोकल विस्कळीत असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मात्र, प्रशासन याबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in