म्हाडाच्या वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गुन्हा

विविध वसाहतीमधील सदनिका-भूखंडधारकाकडून सेवा शुल्क वसूल करून त्यांना पावती देऊन वसूल केलेली रक्कम बँकेत भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
म्हाडाच्या वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गुन्हा

मुंबई : साडेचौदा लाखांचा अपहार केल्याप्रकरणी म्हाडाच्या वरिष्ठ लिपीकाविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. महेंद्र मधुकर रोकडे असे या लिपिकाचे नाव असून त्याच्यावर सेवा शुल्क रक्कमेचा परस्पर अपहार करून म्हाडाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात दोषी ठरल्याने त्याची सेवा बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हाडा कार्यालयात महेंद्र रोकडे हा वरिष्ठ लिपीक म्हणून कामाला होता. विविध वसाहतीमधील सदनिका-भूखंडधारकाकडून सेवा शुल्क वसूल करून त्यांना पावती देऊन वसूल केलेली रक्कम बँकेत भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत त्याने विविध सदनिकाधारक आणि भूखंडधारकाकडून सेवा शुल्क जमा करून त्यांना पावत्या दिल्या होत्या. मात्र जमा केलेली १४ लाख ५५ हजार ७३० रुपयांची सेवा शुल्कची रक्कम बँकेत जमा केली नव्हती. हा प्रकार नंतर मिळकत व्यवस्थापक संजय माने यांच्या निदर्शनास येताच त्यांनी महेंद्रविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर म्हाडाच्या वतीने संजय माने यांनी खेरवाडी पोलिसात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

 या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर महेंद्र रोकडे याच्याविरुद्घ पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

logo
marathi.freepressjournal.in