आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; नोकरीच्या बहाण्याने विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दुकलीस अटक

भारतातील विविध शहरातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून थायलंड येथे बोलावून नंतर त्यांना लाओसमध्ये आणले होते. जेरी आणि गॉडफ्री हे दोघेही वारंवार दुबई आणि थायलंड येथे गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी आतापर्यंत भारतात किती तरुणांना नोकरीसाठी विदेशात पाठविले आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; नोकरीच्या बहाण्याने विदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दुकलीस अटक

मुंबई : विदेशात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची मानवी तस्करी करून या तरुणांना कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. जेरी फिलीप्स जेकब आणि गॉडफ्री थॉमस अल्वारेस अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सनीसह अन्य आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ठाण्यात राहणाऱ्या सिद्धार्थ यादवला नोकरीनिमित्त थायलंडला पाठवण्यात आले होते. तिथे त्याच्यासोबत देशातील विविध शहरातून आलेले इतर काही तरुण होते. त्यांच्या बोगस अकाऊंटच्या माध्यमातून विदेशी नागरिकांशी ओळख करून त्यांना कंपनीत क्रिस्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक केली जात होती. या टोळीने सुरुवातीला दोन ते तीन महिने त्यांना पगार दिला नव्हता. भारतात जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर या सर्व तरुणांना एका रूममधून कोंडून ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना मारहाण केली जात होती. सिद्धार्थने मेलवरून भारतीय दूतावासाला तसेच त्याच्या मित्रांना याबाबतची माहिती दिली होती.

या तक्रारीची भारतीय दूतावास कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे छापा टाकून सिद्धार्थसह इतर तरुणांची सुटका केली होती. भारतात परतल्यावर सिद्धार्थने तिथे काय घडले, याचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. हा तपास हाती येताच एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथको जेरी जेकब आणि गॉडफ्री अल्वारेस या दोघांना बोरिवली येथून अटक केली. ते दोघेही विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते. ते दोघेही लाओस येथील एका कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. त्यांनी भारतातील विविध शहरातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून थायलंड येथे बोलावून नंतर त्यांना लाओसमध्ये आणले होते. जेरी आणि गॉडफ्री हे दोघेही वारंवार दुबई आणि थायलंड येथे गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी आतापर्यंत भारतात किती तरुणांना नोकरीसाठी विदेशात पाठविले आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in