मुंबई: सुमारे ७५ लाखांच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी निलेश जैन या व्यापाऱ्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या निलेशचा पोलिसाकडून शोध सुरू आहे. फिरोजअली शौकतअली शेख यांचा झव्हेरी बाजार येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात वीस कामगार कामाला असून त्यांच्याकडून दागिने बनवून त्यांना त्यांचा योग्य तो मोबदला जातो. चौदा वर्षांपूर्वी त्यांची निलेश जैनशी ओळख झाली होती. त्याचा धनजी स्ट्रिट येथे एक ज्वेलर्स दुकान आहे. अनेकदा तो त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेत होता. दागिने दिल्यानंतर निलेश त्यांना शुद्ध सोने देत होता. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती. एप्रिल २०१८ रोजी त्याने त्यांच्याकडून ७५ लाख रुपयांचे १६५५ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने घेतले होते. त्यामोबदल्यात तो त्यांना शुद्ध सोने देणार होता. मात्र त्याने दिलेल्या मुदतीत शुद्ध सोने दिले नाही. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले होते.
लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांनी त्याला संपर्क साधला असता त्याने व्यवसायात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरच सोने किंवा दागिन्यांचे पेमेंट करतो असे सांगितले. मात्र चार वर्ष उलटूनही त्यांनी सोने किंवा पेमेंट केले नाही. दुकानात गेल्यानंतर निलेशचा दुकान बंद होता. निलेशकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून निलेश जैनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या निलेशचा पोलिसाकडून शोध सुरू आहे.