
मुंबई : अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांचा समाजावर गंभीर परिणाम होतो, असे मत व्यक्त करत मुंबई सत्र न्यायालयाने पोक्सो प्रकरण नोंदवले. १३ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बनकर यांनी हा निकाल दिला.
पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या आत्यासोबत शॉपिंगला गेली होती. तेथे आरोपी अमितकुमार दिनेशप्रसाद गुप्ता याने मुलीशी जवळीक साधली आणि तिच्या छातीला हात लावला. ३१ डिसेंबर २०१३ रोजी अंधेरी येथील डी. एन. नगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला दुसऱ्याच दिवशी अटक करून पोक्सोकायद्यातर्गत गुन्हा दाखल केला.
यावेळी विशेष सरकारी वकील विणा शेलार यांनी भक्कम साक्षी पुरावे न्यायालयासमोर सादर केले, तर आरोपीच्या वकिलांनी विनयभंगाच्या आरोपांचे खंडन केले. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याच्या हेतूने आरोपीने मुलीच्या शरीराला हात लावला नव्हता तर दुकानात कमी जागा असल्यामुळे चुकून मुलीला हात लागल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला होता.