
मुंबई : सुमारे दोन कोटींच्या एमडी ड्रग्जसहीत एका सराईत गुन्हेगाराला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सलीम हारुण रशीद खान असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी १०२८ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने शुक्रवार, २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत इम्रान शोएब खान हा पळून गेल्याने त्याचा शोध सुरू असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. शिवडी परिसरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी रात्री शिवडी क्रॉस रोड, मुदक्क्स मशिदीजवळील आदमजी जिवाजी चाळीसमोर दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच दया नायक व त्यांच्या पथकातील सचिन पुराणिक, दिपक पवार, उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, सुनिल म्हाळसंक, भिकाजी खडपकर, सचिन राऊत, महेश मोहिते, राहुल पवार, प्रशांत भूमकर, अविनाश झोडगे, शशिकांत निकम यांनी एकाला जागीच पकडले, तर दुसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. अटक आरोपीचे नाव सलीम खान असल्याचे उघडकीस आले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १०२८ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात दोन कोटी चार लाख इतकी किंमत आहे. सलीम हा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.