चुन्नाभट्टीतील गोळीबारात सराईत गुन्हेगाराचा मृत्यू ; अल्पवयीन मुलीसह चार जण जखमी

मारेकऱ्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या नऊ विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.
चुन्नाभट्टीतील गोळीबारात सराईत गुन्हेगाराचा मृत्यू ; अल्पवयीन मुलीसह चार जण जखमी

मुंबई - चुन्नाभट्टी येथे रविवारी दुपारी झालेल्या गोळीबारात सुमित ऊर्फ पप्पू येरुणकर या सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला, तर एका आठ वर्षांच्या मुलीसह चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये रोशन निखील लोखंडे, आकाश खंडागळे, मदन पाटील आणि आठ वर्षांची मुलगी त्रिशा शर्मा यांचा समावेश आहे. पूर्ववैमनस्यातून अज्ञात मारेकऱ्यांनी हा गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, मारेकऱ्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या नऊ विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. 

ही घटना रविवारी दुपारी चुन्नाभट्टी येथील व्ही. एन. पुरव मार्गावरील आझाद गल्लीत घडली. सुमित येरुणकर हा स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दुपारी सुमित हा त्याच्या मित्रांसोबत आझाद गल्लीतून जात होता. याचदरम्यान तिथे दुचाकीवरून दोन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी सुमितच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला होता. यात सुमितसह इतर चार जण जखमी झाले होते. या अचानक झालेल्या गोळीबाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. प्रत्येकजण जीवाच्या भीतीने सैरवैरा पळू लागला. ही माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पाच जखमींना शीव रुग्णालयात दाखल केले. तिथे सुमित येरुणकर याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत.

सुमितच्या शरीरात दोन गोळ्या लागल्याच्या जखमा आहेत. रेशनला मांडीला एक, मदनला डाव्या काखेत एक, आकाशच्या दंडावर एक गोळी लागली, तर त्रिशाच्या उजव्या पायाला गोळी घासून गेल्याचे दिसून आले. 

सुमितचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आला आहे. सोमवारी नाताळ आणि आठवडाभरात येणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत झालेल्या गोळीबाराची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मारेकऱ्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी लवकरच दोन्ही मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजवरून मारेकऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्रांच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in