
मुंबई : एससी-एसटी हे संविधानाने ओळखलेली एक वेगळी श्रेणी आहे आणि म्हणूनच त्याअंतर्गत दिलेले आरक्षण निकष मनमानी ठरवता येत नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्याचबरोबर नागरी सेवा परीक्षांमध्ये एससी-एसटी उमेदवारांसाठी असलेल्या अमर्यादित प्रयत्नांच्या तरतूदीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
धर्मेंद्र कुमार या ३८ वर्षीय युवकाने एससी-एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी नागरी सेवा परीक्षेत अमर्यादित प्रयत्नांची परवानगी देणाऱ्या नियमाला न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावली.
कुमार यांनी नऊ वेळा नागरी सेवा परीक्षा दिली होती. या सर्व परीक्षांमध्ये त्यांना अपयश आले होते. नियमांनुसार, इतर मागासवर्ग (OBC) आणि बेंचमार्क अपंगता असलेल्या व्यक्तींना (PwBD) या परीक्षेसाठी नऊ प्रयत्न दिले जातात. तर सामान्य खुल्या श्रेणीतील उमेदवारांना केवळ सहा प्रयत्न दिले जातात. OBC श्रेणीत मोडणारे कुमार यांनी, हा नियम भेदभाव करणारा असल्याचे आपल्या याचिकेत म्हटले होते.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारती दांगरे आणि न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने ४ फेब्रुवारी रोजी निकाल देतान, या आव्हान याचिकेला कोणताही वैध आधार नसल्याचे स्पष्ट करीत ही याचिका फेटाळली.
एससी/एसटी ही ओबीसी पासून वेगळी श्रेणी आहे, आणि म्हणून त्यांच्यासाठी वेगळे निकष निर्धारित केले गेले आहेत, त्यामुळे हे निकष मनमानी ठरवता येत नाहीत, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
ओबीसी श्रेणीतील एक व्यक्ती स्वतःला एससी/एसटी श्रेणीतील व्यक्तीशी तुलना करू शकत नाही, कारण या दोन्ही श्रेणींना आरक्षणाच्या उद्देशाने संविधानात वेगळे स्थान दिले आहे. परिणामी, एससी/एसटी उमेदवारांसाठी अमर्यादित प्रयत्न दिले जातात, तर ओबीसी उमेदवारांना आणि बेंचमार्क अपंगता असलेल्यांना नऊ प्रयत्न दिले जातात, असे कोर्ट म्हणाले.
याचिकाकर्त्याचा दावा होता, की PwBD ला वेगळी श्रेणी मानली जावी आणि त्यात SC/ST किंवा OBC असले तरी इतर सामान्य श्रेणीतील उमेदवारांप्रमाणे त्यांनाही समान प्रयत्न दिले जावेत, हे स्वीकारता येत नाही, असे हायकोर्टाने सांगितले.
PwBD एससी एसटी उमेदवारांना वेगळे निकष लागू
कोर्टाने म्हटले की, PwBD ही एक वेगळी श्रेणी आहे, जरी त्यात सामान्य श्रेणी, SC/ST आणि OBC चे उमेदवार समाविष्ट असू शकतात. परंतु कारण की ती एक आडवी आरक्षण श्रेणी आहे, म्हणून ती उभ्या आरक्षणाला कापून टाकते. आणि म्हणूनच, बेंचमार्क अपंगता (PwBD)असलेल्या श्रेणीतील उमेदवार जर एससी/एसटी श्रेणीतील असतील, तर त्यांना इतर श्रेणीतील उमेदवारांपेक्षा वेगळे निकष लागू असतील," असे हायकोर्टाने सांगितले.