काचेच्या पिंजऱ्यातून मगरींना जवळून पाहता येणार

नव्या मगरी या कमी वयाच्या असतील त्यामुळे त्या पर्यटकांच्या काचेच्या जवळ येतील.
काचेच्या पिंजऱ्यातून मगरींना जवळून पाहता येणार

राणीबागेत मगरी पाहण्यासाठी ‘अंडर वॉटर व्ह्यू इन’ संकल्पना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे काचेच्या पिंजऱ्यात अतिशय जवळून मगरींना पाहता येणार आहे. याचे ६० टक्के काम पूर्ण झालेले आहे. आशियात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात येत असून दिवाळीपर्यंत हा पिंजरा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला होईल. यामुळे राणीबागेच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे.

सध्या राणीबागेत दोन मगरी आणि पाच सुसरी आहे. मात्र पिंजऱ्याचे काम सुरू असल्याने सध्या त्यांना क्वारंटाइन पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. मात्र या मगरी आणि सुसरी वयाने जास्त आहेत. नव्या मगरी या कमी वयाच्या असतील त्यामुळे त्या पर्यटकांच्या काचेच्या जवळ येतील. त्यामुळे मगरींना पाहण्याचा मनमुराद आनंद लुटता येईल. या मगरी आणि सुसरींची संख्या वाढविण्यात येणार असून नव्या ८ सुसरी आणि ५ नव्या मगरी आणण्यात येणार आहेत.

मगरींसाठी बनवण्यात येणारा पिंजरा ४००० स्क्वेअर मीटर असणार आहे. या पिंजऱ्याच्या खाली जाऊन पर्यटकांना पाण्यात पोहणाऱ्या मगरी पाहता येणार आहेत. पर्यटकांना मगरी कशा पोहतात याची कायमच उत्सुकता असते. त्यामुळे हा पिंजरा नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. त्यासाठी या पिंजऱ्याच्या एका बाजूला पाण्याचा भाग असेल, तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक अधिवास म्हणजेच वाळू, माती, आणि पाण्याची छोटी डबकी, काही भागात झाडे अशा प्रकारे हा पिंजरा सज्ज करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in