
मुंबई : माझगाव, मुंबई सेंट्रल, धारावी या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वसाहती असून या वसाहतीच्या दुरुस्तीसाठी कोटींची उड्डाणे घेतली जात आहेत. या वसाहतीच्या डागडुजीसाठी तब्बल २६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दरम्यान, या इमारतींची बाह्य आणि अंतर्गत दुरुस्ती, भिंती, छत, जिने, इमारतींच्या मोकळ्या जागा, शौचालये, स्नानगृह, मलनिस्सारण आणि जलवाहिन्यांचे जाळे यांची कामे केली जाणार आहेत.
मुंबई शहरात पालिकेच्या २२ वसाहतीमध्ये १३३ बीआयटी इमारती आहेत, त्यापैकी ६१ इमारतींमध्ये पालिका भाडेकरूंच्या गृहनिर्माण संस्थांमार्फत पुनर्विकास प्रस्ताव पालिकेला प्राप्त झाले आहेत. ६१ इमारतींपैकी १७ इमारतींचा पुनर्विकास झाला असून ४४ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित ७२ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पालिकेमार्फत नियमितपणे दुरुस्ती करण्यात येते. काही महिन्यांपूर्वी १२ इमारतींच्या दुरुस्तीचे काम पालिकेमार्फत करण्यात आले असून अहवालानुसार येत्या काळात आणखी काही इमारतींची दुरुस्ती होणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.
दरम्यान, पालिकेच्या माटुंगा एफ/उत्तर प्रभाग कार्यालयाचीही डागडुजी करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल ४ कोटी ८९ लाख रुपये खर्चाची निविदा पालिकेने मागवली असून या खर्चावर भाजपने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दुरुस्तीसाठी निम्मा खर्च लागत असेल तर त्यापेक्षा संबंधित इमारतीचा पुनर्विकास करणे योग्य ठरेल, असे भाजपचे प्रवक्ते माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी नमूद केले. एफ-उत्तर इमारत पूर्णपणे पाडून नवीन बांधण्यासाठी पाच ते सहा कोटी रुपयाचा खर्च आला असता. पालिकेने याकडे दुर्लक्ष करत केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी इमारतीची कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे पालिकेची लुटमार करणे योग्य नाही. ही लुटमार यापुढेही सुरू राहिल्यास पालिकेचे दिवाळे निघाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे शिरसाट म्हणाले.
कुठे, किती खर्च
बीआयटी चाळ क्रमांक १ ते ३
सेठ मोती शाह लेन, लव्ह लेन, माझगाव
१३ कोटी ४ लाख रुपये
४२ टेनामेन्टस, आर. एस. निमकर मार्ग, ग्रँट रोड
१ कोटी ६९ लाख रुपये
इमारत क्रमांक १०, ११, १३ ते १९, शाहूनगर, धारावी
११ कोटी २८ लाख रुपये
माटुंगा एफ उत्तर प्रभाग कार्यालय
४ कोटी ८९ लाख रुपये