एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक

या प्रकरणात गुंतवणूक कंपनीच्या दोन भागीदारांना भाईंदरमध्ये अटक करण्यात आली आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक

कोरोना आणि एसटी संप या काळात झालेल्या आर्थिक नुकसानीतून कर्मचारी सावरत असताना पुन्हा एसटी महामंडळाच्या शेकडो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. एसटी महामंडळातील शिपाई ते अधिकारी पदापर्यंतच्या १५० ते २०० जणांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक झाली असून, या प्रकरणात गुंतवणूक कंपनीच्या दोन भागीदारांना भाईंदरमध्ये अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील संगणक विभागातील निवृत्त नारायण निलवे (वय ६९) यांची २०१८ मध्ये भाईंदर येथील अण्णा अमृते यांच्याशी ओळख झाली. अमृते याने आपण १५ वर्षांपासून शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करत असल्याचे निलवेंना सांगितले. बँकेत ठेवलेल्या रकमेवर व्याज कमी मिळत असल्याने निलवे यांनी शेअर्स गुतवणुकीमध्ये दोन लाख रुपये गुंतवले. दरमहा त्यांना या गुंतवणुकीवर १० हजार रुपये मिळू लागले. विश्वास बसल्याने त्यांनी आणखी तीन लाख रुपये गुंतविले. यानंतरही काही महिने नियमित परतावा मिळत असल्याने त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावेही पैसे गुंतविले. काही कालावधीनंतर परतावा मिळणे बंद झाले. अमृते यांच्याकडून परतावा मिळण्यात चालढकल होत असल्याने निलवे यांनी भाईंदर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर तपासामध्ये एजी सिक्युरिटीज, केके सिक्युरिटीज आणि एए सिक्युरिटीज या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली या दोघांनी सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हा दाखल होताच पळालेल्या अमृते आणि रुंगटा याला अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in