पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात कोट्यवधींचा खर्च ;पालिकेच्या विविध वॉर्डात आयोजित बैठकीत फाईव्ह स्टार मेजवानी

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात कोट्यवधींचा खर्च ;पालिकेच्या विविध वॉर्डात आयोजित बैठकीत फाईव्ह स्टार मेजवानी

मुंबई : मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिकेच्या विविध वॉर्डात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. या जनता दरबारात किती समस्यांचे निवारण होते, हे तेच सांगू शकतील; मात्र प्रशासनानेच पालिकेच्या तिजोरी उघडून दिली आणि त्यामुळे तिजोरी खाली करण्याचे काम सुरू असून, करदात्या मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे, असा आरोप मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

करदात्या मुंबईकरांच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होतो. ५२ हजार कोटींचा अर्थसंकल्प, ८८ हजार कोटींच्या ठेवी आहेत. राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने, अजित पवार यांची सत्ता स्थापन होताच मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तर पालिका मुख्यालयात कार्यालय सुरू केले. जनतेसाठी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी पत्र लिहिले होते, त्यानंतर प्रशासनाने कार्यलय उपलब्ध केल्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मागेच स्पष्ट केले; मात्र जनता दरबाराचे आयोजन आता पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात केले जात असून, जेवण, सजावट यावर लाखो रुपयांचा खर्च पालिकेच्या तिजोरीत केला जात आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या के पूर्व विभागातील जनता दरबारात जेवण पुरवण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये खर्च झाल्याचे समजते. त्यामुळे जेवण पुरवण्यासाठी दीड लाख आणि बॅनर, होडींग पुरवण्यासाठी २ लाख ४० हजार अशाप्रकारे सुमारे ४ लाख रुपयांचा खर्च झाला असून, अशाप्रकारे दोन्ही पालकमंत्र्यांनी २४ विभाग कार्यालयांमध्ये जनता दरबार आयोजित केल्यामुळे सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया

पालिकेने तिजोरीचे दरवाजे उघडले

करदात्या मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांवर खर्च झाला पाहिजे. परंतु पालिका प्रशासनाचे हात दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळे हात वाचवण्यासाठी पालिका प्रशासनाने तिजोरीचे दरवाजे उघडले असून, करदात्या मुंबईकरांच्या पैशांची लूट सुरू आहे. पालिकेच्या इतिहासात न घडलेल्या गोष्टी आता घडत आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

फोनला प्रतिसाद नाही

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना या विषयी प्रतिक्रिया विचारण्यासाठी फोनवर संपर्क साधला; मात्र पालकमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in