क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेस आमदार नांदेड, मुंबईचे - वडेट्टीवार; या गद्दारांवर लवकरच कारवाई केली जाईल

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मत दिल्यामुळे जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष) हे महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले.
@VijayWadettiwar
@VijayWadettiwarTwitter
Published on

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मत दिल्यामुळे जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष) हे महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. काँग्रेसच्या नांदेड व मुंबईतील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे आम्ही शोधून काढले असून, त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

वडेट्टीवार म्हणाले, “या गद्दार आमदारांमध्ये नांदेडमधील व मुंबईतील काहीजण आहेत. आम्ही त्यांची नावे शोधून काढली आहेत. त्यांची नावे सध्या उघड करता येणार नाहीत. यासंदर्भातील अहवाल आम्ही दिल्लीतील आमच्या पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे. या गद्दारांवर लवकरच कारवाई केली जाईल, त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वांना माहिती मिळेल.”

“विधान परिषदेच्या निवडणुकीत काही आमदार आमच्याबरोबर नव्हते ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही काहींनी गद्दारी केली होती. यावेळी मात्र आम्ही त्या सर्वांवर कारवाई करणार आहोत. गद्दारांना आम्ही शोधून काढले आहे. कोणी आम्हाला मते दिली, कोणी दिली नाहीत, कोणी पक्षाशी गद्दारी केली, या लोकांची आमच्याकडे यादी आहे. या लोकांवर कारवाई व्हावी यासाठी आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी (नाना पटोले) या आमदारांबाबतचा एक अहवाल दिल्लीला आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवला आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील,” असे वडेट्टीवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी पैशाच्या बळावर मते फोडली

वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजपने आणि सत्तेतील खोकेबाज लोकांनी पैशाच्या बळावर काही मते फोडली. काही मते राजकीय दबाव टाकून फोडली. आमच्या काही आमदारांनी पक्षाचा आदेश न जुमानता सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान केले, ही गद्दारी आहे. या गद्दारांवर लवकरच कारवाई होईल. विधान परिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेतील लोकांनी पैशांचा अमाप वापर केला. एकेका मतासाठी चार-चार कोटी रुपये खर्च केले. राज्याची तिजोरी लुटून या लोकांनी जे पैसे कमावले तेच पैसे निवडणुकीत वापरले, मतांची खरेदी केली आणि त्यांचा उमेदवार निवडून आणला.

गद्दारांची माहिती मिळाली, कारवाई होणार - पटोले

विधान परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी करणारे आमदार कोण होते त्याची माहिती मिळाली असून त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या याच गद्दारांनी दोन वर्षांपूर्वी पक्षाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला होता, असा दावाही पटोले यांनी केला. यावेळी आम्ही सापळा रचला होता आणि गद्दारांना शोधून काढले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे भविष्यात पक्षाशी गद्दारी करण्यास कोणीही धजावणार नाही, असेही पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in