राणी बाग प्राणीसंग्रहालयात अस्वलाच्या जोडीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेल्या राणी बागेत दररोज १५ ते १६ हजार पर्यटक भेट देतात
राणी बाग प्राणीसंग्रहालयात अस्वलाच्या जोडीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Published on

देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात आता शिवानी अस्वलाच्या सोबतीला शिवा नर आला आहे. प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना आता पेंग्विन, करिश्मा शक्ती वाघाच्या धमाल मस्तीबरोबर शिवानी अन् शिवाच्या मस्तीचा अनुभवही घेता येणार असल्याने राणी बागेत गेल्या काही दिवसांपासून गर्दी पाहायला मिळत आहे.

पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेल्या राणी बागेत दररोज १५ ते १६ हजार पर्यटक भेट देतात. शनिवार, रविवार पर्यटकांची संख्या २५ हजारांच्या घरात पोहोचते. याचे मुख्य कारण म्हणजे राणी बागेतील पेंग्विन करिश्मा शक्ती, हरणे याची धमाल मस्ती. त्यात आता शिवा व शिवानी अस्वलाच्या जोडीचा आनंद घेता येणार असल्याची माहिती राणी बागेतील जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी दिली.

पालिकेच्या या उद्यान व प्राणी संग्रहालयात नऊ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.

logo
marathi.freepressjournal.in