कफ परेडमधील मच्छिमार नगर परिसरात अग्नितांडव; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
Photo - FPJ
Photo - FPJ
Published on

मुंबई : कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेमुळे ऐन दिवाळी सणात परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मच्छिमार नगर येथील एका चाळीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या तीन बॅटरी, वीज जोडणी आणि घरातील वस्तूंनी पेट घेतला व आग पसरली. सुमारे १०x१० फुटांच्या जागेत आगीचे हे तांडव सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि बेस्टचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.

यावेळी आगीच्या विळख्यातून चार जणांना तातडीने बाहेर काढण्यात आले. आणि त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १५ वर्षीय यश खोत या मुलाला डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये देवेंद्र चौधरी (३०) यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, विराज खोत (१३) आणि संग्राम कुर्णे (२५) या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक तपासानुसार इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमुळे आग भडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in