सायबर गुन्ह्यांतील पैसे क्रिप्टोकरन्सीद्वारे कंबोडियात; चिनी नागरिकांच्या रॅकेटमधील १२ जणांच्या टोळीला अटक 

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सायबर गुन्ह्यांचा धुमाकूळ घालत शेकडो जणांना ३० कोटी रुपयांहून अधिक रकमेला गंडा घालणारे मुख्य सिंडिकेट कंबोडिया या देशातून चिनी नागरिक चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.
सायबर गुन्ह्यांतील पैसे क्रिप्टोकरन्सीद्वारे कंबोडियात; चिनी नागरिकांच्या रॅकेटमधील १२ जणांच्या टोळीला अटक 
Published on

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सायबर गुन्ह्यांचा धुमाकूळ घालत शेकडो जणांना ३० कोटी रुपयांहून अधिक रकमेला गंडा घालणारे मुख्य सिंडिकेट कंबोडिया या देशातून चिनी नागरिक चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. या सिंडिकेटच्या १२ भारतीय हस्तकांना मुंबई पोलिसांनी देशातील विविध भागातून अटक केली आहे. गुन्ह्यांमध्ये कमावलेली रक्कम भारतातील हस्तक क्रिप्टोकरन्सीत रूपांतरित करून कंबोडियात पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गावदेवी येथे राहणाऱ्या ७४ वर्षीय वृद्धाला गुंतवणुकीवर भरघोस नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा गेल्या वर्षी दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. चौकशीत फिर्यादीची रक्कम मोहोळ येथील केशव कुलकर्णी या इसमाच्या बँक खात्यात गेल्याचे आढळले. त्या खात्यातून रक्कम पंजाबमधील बँक खात्यात वळवण्यात आली होती. तेथून रोख रकमेच्या स्वरूपात काढलेली रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून थेट कंबोडिया देशात पाठवण्यात आल्याचे आढळले. या व्यवहार पाहून आश्चऱ्यचकित झालेल्या पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर रॅकेट उघडकीस आले.

केशव कुलकर्णी याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत सायबर गुन्ह्याचे हे रॅकेट आंतरराष्ट्रीय असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अटक आरोपींद्वारे एकूण ११० बँक खाती मिळाली असून त्या खात्यांमध्ये अंदाजे ३० कोटींहून अधिक रक्कम सायबर फसवणुकीच्या माध्यमातून जमा झाली.

अशी घ्या दक्षता

सायबर गुन्हेगार नागरिकांना गुंतवणुकीवर दामदुप्पट नफा मिळवून देण्याच्या आमिषासह वेगवेगळी प्रलोभने दाखवून ऑनलाइन गंडा घालत असतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपली कोणतीही माहिती अथवा ओटीपी कोणालाही देऊ नये.

डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

logo
marathi.freepressjournal.in