चेंबूरमध्ये सिलिंडरचा स्फोट ;एकाच कुटुंबातील चार जणांसह ८ जखमी ११ रहिवाशांची सुखरूप सुटका

रहिवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी घरांच्या पहिल्या मजल्यावर धाव घेतली. यापैकी घरांमध्ये अडकलेल्या ६ जणांसह ११ जणांची सुटका करण्यात आली.
चेंबूरमध्ये सिलिंडरचा स्फोट ;एकाच कुटुंबातील चार जणांसह ८ जखमी ११ रहिवाशांची सुखरूप सुटका

मुंबई : चेंबूर कॅम्प परिसरातील गोल्फ क्लबजवळील एका घराचा भाग बुधवारी सकाळी शेजारील चाळीतील एका घरावर कोसळला. या दुर्घटनेत एका घरात सिलिंडरचा स्फोट झाला आणि एकाच कुटुंबातील चार जणांसह ८ जण जखमी झाले. जखमींना गोवंडी शताब्दी, सायन आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेत अडकलेल्या ११ रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले. तर रात्री उशिरापर्यंत घरांचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.

चेंबूर कॅम्प परिसरातील गोल्फ क्लबजवळील जुन्या बॅरेक्समध्ये सकाळी ७.५० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तळमजला अधिक एक मजली घर असलेल्या या भागात मन्नूभाई पटेल या रहिवाशाचे टी/४८ घर आहे. तळमजल्यावरील घर त्यांनी मनोज निर्भवणे (५४) यांना भाड्याने दिले असून या भाडेकरूच्या घरात गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटाने बॅरेक्सचा परिसर हादरून शेजारची चार ते पाच घरे कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. रहिवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी घरांच्या पहिल्या मजल्यावर धाव घेतली. यापैकी घरांमध्ये अडकलेल्या ६ जणांसह ११ जणांची सुटका करण्यात आली.

मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याची खात्री करण्यासाठी जवानांची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या.

दुर्घटनेतील जखमी अंभोरे कुटुंबातील अशोक अंभोरे (२७) यांच्या दोन्ही हातांना आणि पायाला मार लागला असून रोहित अंभोरे (२९) आणि राहुल कांबळे (३५) यांच्या पाठीला मुका मार बसला आहे. पार्थ सिंह (२१) यांच्या नाकाला इजा झाली आहे. या चौघांना जवळच्या शताब्दी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.

दरम्यान, विकास अंभोरे (५०), सविता अंभोरे (४७) यांच्यावर आधी शताब्दी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. नंतर ते या भागातील शीव या खासगी रुग्णालयात दाखल झाले. तेथे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. मनोज निर्भवणे हे ३५ ते ४० टक्के भाजले असून त्यांच्या पायांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर चेंबूर येथील स्वस्तिक पार्क रुग्णालयात अतिदक्षता विभागात तर सुनंदा निर्भवणे (४९) या सुमारे ८० टक्के भाजल्या आहेत. त्यांचा चेहरा, हात, पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in