अतिवेग व सीटबेल्ट न लावल्याने सायरस मिस्त्री यांचा बळी

कारचालक महिला डॉक्टर अनायता पंडोले व पती दरियस पंडोले हे जखमी झाले आहेत.
अतिवेग व सीटबेल्ट न लावल्याने सायरस मिस्त्री यांचा बळी

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात रविवारी निधन झाल्यानंतर त्याची कारणे उघड होत आहेत. अपघाताच्या वेळी सायरस यांची मर्सिडिज कार १३४ ताशी वेगाने धावत होती. तसेच त्यांनी सीटबेल्ट न लावल्याचे उघड झाले आहे.

मिस्त्री यांची मर्सिडिज जीएलसी २२० ही डिव्हायडरवर आपटली. त्यात मिस्त्री व जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. तर कारचालक महिला डॉक्टर अनायता पंडोले व पती दरियस पंडोले हे जखमी झाले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमधून मिस्त्री यांच्या अपघातावर प्रकाश पडला आहे. अपघाता वेळी मिस्त्री यांची कार १३४ किमी वेगाने चालली होती. दुपारी २.२१ वाजता कारने चारोटी नाका ओलांडला. अवघ्या नऊ मिनिटांत या कारने २० किमी अंतर पार केले.

पोलिसांनी सांगितले की, वेगवान कार व ओव्हरटेक करताना जजमेंटमध्ये झालेल्या चुकीमुळे कार रस्त्याच्या दुभाजकाला आदळली. या अपघातात ठार झालेल्या मिस्त्री व जहांगीर या दोघांनी सीटबेल्ट लावला नव्हता. डिव्हायडरला धडक दिल्यानंतर कारच्या एअरबॅग लगेच उघडल्या; मात्र मागील एअरबॅग वेळेवर उघडल्या नाहीत.

हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कार अत्यंत वेगाने चालली होती. दुसऱ्या गाडीला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करताना कार दुभाजकाला धडकली.

अनेक दुखापती झाल्याने मृत्यू

शवविच्छेदन अहवालानुसार, अपघातावेळी सायरस यांच्या शरीरात दुखापती झाल्या आहेत. वैद्यकीय भाषेत त्याला ‘पॉलिट्रामा’ म्हणतात. याचमुळे सायरस यांचा मृत्यू झाला. जे. जे. रुग्णालयात रविवारी रात्री सायरस व जहांगीर यांचे शवविच्छेदन झाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in