मुंबई : मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर लाखो मुंबईकरांची क्षुधा शांत होते, ते डबेवाले बुधवार, ९ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत.
९ ते १४ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील, अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
मुंबईतील डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यातील भागातील गावांमधून येतात.
सुट्ट्यांमुळे प्रत्यक्षात दोनच दिवस सेवा बंद
या सहा दिवसांत रविवारच्या एका सुट्टीचा समावेश आहे. तसेच महावीर जयंती, हनुमान जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती या सुट्ट्याही आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले दोन दिवस सुट्टी घेणार असून मंगळवार, १५ एप्रिलपासून ही सेवा पुन्हा सुरू करणार आहेत. १५ एप्रिलपासून पुन्हा सकाळी डबेवाला नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर हजर होऊन आपली सेवा देईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या सुट्टीच्या कालावधीतील ग्राहकांनी पगार कापू नये, अशी विनंती अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.