
मुंबई : कबुतरांना दाणे न टाकण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केल्यानंतरही पक्षीप्रेमींकडून दाणे टाकण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे पालिकेने शनिवारी दादर येथील कबुतरखाना बांबूच्या सहाय्याने पूर्णपणे बंद केला असून ताडपत्रीने झाकले आहे. मात्र, तरीही कबुतरांचे थवे तेथे येतच आहेत. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी मोठ्या संख्येने कबुतरांचे थवे पाहायला मिळाले.
दोन दिवसांपूर्वी दादर कबुतरखाना बंद करण्यासाठी पोहोचलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्राणीप्रेमींनी प्रचंड विरोध केला. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अखेर कारवाई तात्पुरती स्थगिती करण्यात आली. त्यानंतर शनिवारी पुन्हा कबुतरखाना बंद करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले आणि बांबूच्या सहाय्याने कबुतरखाना पूर्णपणे बंद केला. तसेच, बांबूच्या फटीतून कबुतर आत शिरू नयेत, यासाठी ते ताडपत्रीने झाकण्यात आले. यानंतरही रविवारी आणि सोमवारी मोठ्या संख्येने याठिकाणी कबुतर पाहायला मिळाले. तसेच, परिसरातील दुकानांच्या पत्र्यावरही कबुतरांचे थवे बसल्याचे पाहायला मिळत होते. या दरम्यान पालिकेने केलेल्या कारवाईचा काही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट मत याठिकाणच्या दुकानदारांनी व्यक्त केले. याबाबत जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पालिकेने दादर येथे केलेली कारवाई अत्यंत योग्य आहे. ताडपत्री लावल्यावरही कबुतरे त्याठिकाणी येतील. मात्र, धान्य मिळत नसल्याचे लक्षात येताच ते तिथे परत येणार नाहीत. लोकांनी धान्य टाकायचे बंद केले तर हळूहळू या ठिकाणी येणाऱ्या कबुतरांची संख्या कमी होईल. एक दिवस असा येईल की, या ठिकाणी एकही कबूतर नसेल. - जय श्रृंगारपुरे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना, अध्यक्ष