
मुंबई : दादरमधील कबूतरखाना येथे आंदोलन करणे तसेच महापालिकेने टाकलेल्या ताडपत्रीची तोडतोड करणे जैन आंदोलकांच्या अंगलट आले आहे. मुंबई पोलिसांनी महापालिकेच्या तक्रारीची वाट न पाहता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. दादर पोलीस ठाण्यात १५० जणांविरोधात दंगल, बेकायदा जमावबंदी व महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. कबुतरांच्या विष्ठेमुळे परिसरात आजार वाढतात तसेच नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली. परंतु या कारवाईला जैन समाजाकडून तीव्र विरोध करण्यात आला. कबुतरखाना बंद करू नये अशी मागणी जैन समाजाने केली आहे. मुंबई महापालिकेच्या कारवाईचा निषेध करत दादर येथील कबूतरखाना येथे काही लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून कबूतरखान्यावरील ताडपत्रीची मोडतोड केली तसेच बांबूही कापले. मुंबई महापालिकेने या आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.