
मुंबई: दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना हटवण्यासाठी शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास आलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या कारवाईमुळे काही वेळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. तर जमावाचा विरोध लक्षात घेता पालिकेने कारवाई न करताच काढता पाय घेतला. त्यामुळे पालिकेची कारवाई फसल्याची चर्चा सुरू होती.
कबुतरांच्या विष्टेमुळे आणि घाण वासामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना श्वासाच्या आजाराला सामोरे जावे लागत होते. या कारणास्तव सदर कबुतरखाना हटविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, मंत्री उदय सामंत यांनी कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर गेल्या महिन्यांत पालिका जी उत्तर विभागाने सदर कबुतरखान्यावरील लोखंडी शेड आणि लगतचे पत्रे काढले होते.
कबुतरखाना नव्हे, मूळचा पाण्याचा कारंजा
ग्रेड २ ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना १९३३ मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. मात्र, अनेक रहिवाशांनी नंतर तिथे कबुतरांना दाणे देण्यास सुरुवात केली. हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे. दरम्यान, माहीम येथील एल. जे. मार्ग येथील डॉमिनोज पिझ्झा कबुतरखाना आणि हिंदुजा रुग्णालयाजवळील कबुतरखान्यात कबुतरांसाठी खाद्य टाकण्यात आल्याच्या आरोपावरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.