

मुंबई : दादर पश्चिम येथील एन. सी. केळकर मार्गावरील स्टार मॉलमध्ये मोठी दुर्घटना टळली. मॉलच्या आत असलेल्या मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंटच्या किचनमध्ये शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणी कागद आणि मोठ्या प्रमाणात सामान असल्यामुळे ही आग मोठी झाली होती. दरम्यान या आगीत अग्निशमन दलाचे पाच अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.
अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्यांच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीची काच फोडली आणि आतमध्ये प्रवेश केला. यादरम्यान पोलीस, १०८ ॲम्ब्युलन्स आणि स्थानिक वॉर्ड कर्मचारी लगेचच घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर काही मिनिटांत म्हणजेच दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी, अग्निशमन दलाने ही आग 'लेव्हल १' म्हणून घोषित करून पूर्णपणे नियंत्रणात आणली. मात्र या आगीत अग्निशमन दलाचे कर्मचारी कपिल धामरे (२६), वरिष्ठ स्टेशन अधिकारी हरीश नारकर (वय ४५), अग्निशामक प्रवीण पवार (वय ३२), अग्निशामक संजू पडवी (वय २९) आणि अग्निशामक सुदर्शन अहिरे (वय ३३) हे जखमी झाले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी आग लागल्याने भीतीचे वातावरण
नेहमी गजबजलेल्या या ठिकाणी आग लागल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते, तर मॉलमधील नागरिक घाबरून बाहेर येण्यासाठी धावपळ करत होते. दरम्यान प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी लोकांना धीर देत मॉलबाहेर काढले. दरम्यान, या आगीमागील नेमके कारण समोर आले नाही, मात्र याचा तपास सुरू करण्यात आला आहे.