

अभिषेक पाठक/मुंबई
मुंबईतील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या दादर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून मध्य रेल्वेने पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाचा भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या हद्दीत नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पामुळे स्थानकातील गर्दी कमी होण्यास आणि गाड्यांच्या संचालनात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
या नवीन प्लॅटफॉर्मसाठी पश्चिम रेल्वेच्या बाजूची जमीन संपादित केली जात असून, यामुळे दळवी नगरमधील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागात ४६ अतिक्रमणे ओळखण्यात आली असून, त्यापैकी ४० जणांना निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली आहे. ६ प्रकरणांवर प्रक्रिया सुरू असून १४ प्रकरणे उच्च न्यायालयात आहेत. पुनर्वसन योजनेंतर्गत १५ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी घरे देण्यात आली आहेत. यातील १३ बांधकामे पाडण्यात आली असून दोन अद्याप शिल्लक आहेत. उर्वरित ११ प्रकरणांमध्ये पुनर्वसन किंवा व्यावसायिक गाळ्यांच्या वाटपासाठी ‘एमएमआरडीए’सोबत चर्चा सुरू आहे.
उपनगरीय गाड्यांच्या विलंबाची कोंडी फुटणार
हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी नवीन क्रमांकाची पद्धत लागू केली जाईल. दादर हे लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचे अदलाबदलीचे स्थानक असल्याने या विस्तारामुळे स्थानकाची क्षमता वाढून गाड्यांच्या विलंबाची समस्या कमी होईल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये मोठे बदल
नवीन प्लॅटफॉर्मचा वापर प्रामुख्याने उपनगरीय गाड्यांच्या कामकाजासाठी केला जाणार असून, यामुळे पिक अवरमध्ये गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा होईल. या प्रकल्पामुळे दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्येही मोठे बदल होणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेकडे ७ प्लॅटफॉर्म असून एकाचे काम सुरू आहे, तर मध्य रेल्वेचे ७ प्लॅटफॉर्म आणि एक नियोजित आहे.